चालता बोलता न्यूज

Search Everything

पुणे ग्रामीण पोलिसांच्या वार्षिक कामकाजाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून कौतुक; 'उत्कृष्ट तपासा'साठी पथकांचा सन्मान

Main Admin / May 03, 2026, 04:25 AM IST

Article link copied

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी यांनी पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय आणि हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला भेट देऊन वार्षिक निरीक्षण कार्यक्रम पार पाडला. या भेटीदरम्यान त्यांनी पुणे ग्रामीण दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या
महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गुन्हे आढावा बैठकीत गुन्ह्यांचे प्रमाण रोखणे, गुन्हेगारांना आळा घालणे, दोषसिद्धीचे प्रमाण वाढवणे आणि एन.डी.पी.एस. (अमली पदार्थ) गुन्ह्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. नवीन कायद्यानुसार गुन्ह्यांची विल्हेवाट लावण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला:
पोलीस पथके: स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB), राजगड आणि रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या पथकांना 'उत्कृष्ट तपासा'साठी सन्मानित करण्यात आले. तसेच दौंड, जुन्नर आणि मंचर पोलीस स्टेशनला 'दोषसिद्धी'साठी गौरवण्यात आले.
पोलीस पाटील: श्रीमती कल्पिता बोऱ्हाडे (लाखणगाव), सौ. नीता वाघमारे (लिंगाळी) आणि सौ. शैला खेडकर (भांबार्डे) या महिला पोलीस पाटलांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट पोलीस पाटील' पुरस्कार देण्यात आला.
गणेश मंडळे: पर्यावरणपूरक देखावे आणि नियमांचे पालन केल्याबद्दल मार्केटयार्ड मित्र मंडळ (मंचर), जय भवानी गणेश मित्र मंडळ (वांगणी) आणि मोरया प्रतिष्ठान (वरवंड) यांना 'उत्कृष्ट मंडळ' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
उद्योजक संघटनेसोबत झालेल्या बैठकीत स्थानिक लोकांकडून होणाऱ्या त्रासाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासनाकडून उद्योजकांना कायदेशीर मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. याशिवाय, पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसाठी 'दरबार' भरवण्यात आला होता, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे प्रश्न आणि इतर समस्यांचे निराकरण करण्यात आले
तपासणीदरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व दप्तर आणि कागदपत्रे अद्ययावत असल्याची खात्री करण्यात आली. "पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी सर्वांनी आपले वर्तन उत्तम ठेवावे आणि शिस्त पाळावी," अशा कडक सूचना सुनील फुलारी यांनी दिल्या. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आश्वासन देऊन आभार मानले.


Advertisement Slot