पिंपरी-चिंचवड:
71ebc1fd-86e8-4dea-9d3b-f7b6e045871b.jpeg 119.69 KB
संघवी केशरी महाविद्यालय, चिंचवड येथील मराठी विभागप्रमुख प्रा. प्रवीण जावीर यांना दिनांक ११ मे २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (Ph.D.) ही पदवी प्राप्त झाली. त्यांनी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. शांताराम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली 'जयंत पवार यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास' या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात आयोजित मौखिक परीक्षेत प्रा. प्रवीण जावीर यांनी सर्वप्रथम आपल्या संशोधनाचे सादरीकरण केले आणि विद्यार्थी, प्राध्यापक तसेच परीक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे या मौखिक परीक्षेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून आलेले बहि:स्थ परीक्षक प्रा. डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी प्रा. प्रवीण जावीर यांना विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्याची शिफारस केली. यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे यांनी *प्रा प्रवीण जावीर हे डॉ प्रवीण जावीर झाले* अशी घोषणा केली. या प्रसंगी तळेगांव ढमढेरेच्या महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख आणि मराठी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे उपस्थित होते. याशिवाय इतर महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, विभागातील संशोधक विद्यार्थी, आप्तेष्ट आणि मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा. प्रवीण जावीर यांना विद्यावाचस्पती पदवी प्राप्त झाल्याबद्दल श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एल डोंगरे यांनीही प्रा. प्रवीण जावीर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. संस्थेतील आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर सहकारी, आजी-माजी विद्यार्थी यांनी प्रा.प्रवीण जावीर यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला.