बीड: माणुसकीला आणि रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून समोर आली आहे. ज्या आजोबांच्या कुशीत नातवंडं सुरक्षित असतात, तिथेच एका नराधम आजोबाने आपल्या ३ वर्षांच्या चिमुकल्या नातीवर पाशवी अत्याचार केला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार घडला. पीडित चिमुकलीची आई काही दिवसांपूर्वी आपल्या ३ वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरी आली होती. मात्र, पोटच्या मुलीच्या निरागस चिमुकलीवर तिच्याच सख्ख्या ५० वर्षीय आजोबाने वाईट नजर टाकली.
१६ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत, घरात कुणी नसताना या नराधम आजोबाने आपल्या अल्पवयीन नातीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. माणुसकीची सर्व सीमा ओलांडून या ५० वर्षीय नराधमाने नात्याला काळिमा फासला.
हा नराधम वारंवार कुकर्म करत असल्याने त्या निरागस चिमुकलीला शारीरिक त्रास होऊ लागला. वेदना असह्य झाल्याने शेवटी त्या चिमुरडीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. स्वतःच्या वडिलांनीच पोटच्या लेकीवर असा अत्याचार केल्याचे ऐकताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने कोणतीही भीती न बाळगता थेट पोलिसांकडे धाव घेण्याचा धाडसी निर्णय घेतला.
याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६४(२), ६५(२) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) च्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी या ५० वर्षीय नराधम आजोबाला तातडीने बेड्या ठोकल्या असून, त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी परिसरातून होत आहे.