चालता बोलता न्यूज

Search Everything

पावसाला विलंब; पाणी बचतीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

Main Admin / Jun 17, 2026, 02:30 AM IST

Article link copied

पिंपरी (प्रतिनिधी) : यंदा अल निनोच्या परिणामामुळे मान्सूनच्या आगमनाला विलंब होत असून शहरातील जलस्रोतांवर वाढता ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी बचतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना विविध पाणी बचत उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे. वाहनांची अनावश्यक धुलाई टाळावी, तर व्यावसायिक वाहन धुलाई केंद्रांनी पुनर्वापर यंत्रणांचा वापर करावा. खासगी व सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये नवीन पाणी भरणे शक्यतो टाळावे, असेही सांगण्यात आले आहे.

घरगुती तसेच व्यावसायिक आस्थापनांमधील नळ, फ्लश टँक, पाईपलाईन आणि जलवाहिन्यांमधील गळती तातडीने दुरुस्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाणी वापर कमी करण्यासाठी नळांना एरेटर्स बसविणे आणि जलकार्यक्षम उपकरणांचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.
महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी नागरिकांच्या सहकार्यामुळेच शहराची जलसुरक्षा अधिक मजबूत होईल, असे सांगितले. कार्यकारी अभियंता महेश बरिदे यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, पाण्याचा पुनर्वापर वाढविणे आणि अपव्यय टाळणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

महापौर रवि लांडगे यांनी पाणी हा भावी पिढ्यांसाठीचा अमूल्य ठेवा असल्याचे सांगत जलसंवर्धन उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. शहरातील गृहसंस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि उद्योगांनी पावसाचे पाणी साठवण यंत्रणांची तपासणी करून त्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवाव्यात, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Advertisement Slot