चालता बोलता न्यूज

Search Everything

ताथवडेत ड्रेनेज चेंबर ओव्हरफ्लो तीन दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर, साथीच्या आजारांचा धोका वाढला सांडपाण्याच्या दुर्गंधीने स्थानिक नागरिक त्रस्त 

REVAN SHINDE / Jul 06, 2026, 07:59 AM IST

Article link copied

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ताथवडे येथील जीवन नगर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून ड्रेनेज लाईनचे चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. चेंबरमधून बाहेर पडणारे दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. या गंभीर समस्येकडे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ताथवडेच्या जीवन नगर हा गृहनिर्माण सोसायट्यांचा आणि रहिवासी परिसर आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून येथील मुख्य चौकात आणि रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी साचल्याने संपूर्ण परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना घरात राहणे आणि खिडक्या उघड्या ठेवणेही अशक्य झाले आहे. रस्त्यावरून चालताना पादचाऱ्यांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. तसेच, दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना या सांडपाण्यातूनच वाहने चालवावी लागत असून पादचाऱ्यांच्या अंगावर उडणाऱ्या घाण पाण्यामुळे वाद किरकोळ वाद होत आहेत. स्थानिक सोसायटीतील नागरिकांनी या समस्येबाबत महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडे तातडीने ऑनलाईन तक्रारी नोंदविल्या होत्या. मात्र, तीन दिवस उलटूनही पालिकेच्या एकाही कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलेली नाही किंवा कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. पालिकेच्या या संथ आणि उदासीन कारभारामुळे करदात्या नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आम्ही नियमित कर भरतो, मग मूलभूत सुविधांसाठी एवढी टाळाटाळ का?" असा संतप्त सवाल स्थानिक रहिवासी करत आहेत. जीवन नगर परिसरातील सोसायट्यातील नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर पुढील २४ तासांत ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती करून सांडपाण्याची विल्हेवाट लावली नाही आणि रस्ता स्वच्छ केला नाही, तर परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन महापालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही केली आहे. --------------- आरोग्य धोक्यात, साथीच्या आजारांची भीती सध्या उन्हाळा संपून पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने हवेत आधीच आर्द्रता वाढली आहे. अशातच तीन दिवसांपासून साचून राहिलेल्या ड्रेनेजच्या सांडपाण्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरात माश्या आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि गॅस्ट्रो यांसारख्या अत्यंत घातक आणि संसर्गजन्य साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांचे आरोग्य यामुळे गंभीर धोक्यात आले आहे. 

Advertisement Slot