पिंपरी-चिंचवडवर पाणी कपातीचे संकट
Article link copied
- पवना धरणात केवळ २० टक्के साठा, नागरिकांना जपून वापराचे आवाहन
पिंपरी
जून महिना सुरू झाला तरी पावसाने दडी मारल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरावर पाणी कपातीचे मोठे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळ येथील पवना धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला असून, सध्या धरणात केवळ २०.२६ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. गतवर्षी आजच्या तारखेला धरणात २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत यंदा पाणीसाठा घटल्याने महापालिका प्रशासनाची चिंता वाढली असून, नागरिकांना पाणी अत्यंत जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. पवना धरणातून दररोज ५३० एमएलडी पाणी तर आंद्रातून १०० एमएलडी पाणी केला जात असून शहराला ६३० एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे शहराला मागील सहा वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. मात्र, यंदा पावसाने मोठी ओढ दिली आहे. कडक उन्हाळा आणि लांबलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास धरणातील मृत साठ्यातून पाणी उपसा करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखून पिंपरी-चिंचवड महापालिकेने आधीच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. समन्यायी पाणी वाटपासाठी लागू करण्यात आलेली ही पद्धत आता धरणातील घटत्या पाणीसाठ्यामुळे पुढील काही दिवस अशीच सुरू राहण्याची चिन्हे आहेत. अनेक सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये पाण्याचा दाब कमी असल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिका प्रशासनाकडून सध्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
एकंदरीत, वरुणराजा जोपर्यंत पिंपरी-चिंचवडकरांवर बरसत नाही, तोपर्यंत शहरावरील पाण्याचे संकट कायम राहणार असून, नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.
---------------
गतवर्षीच्या तुलनेत साठा कमी
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा पावसाने वेळेवर हजेरी न लावल्यामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने खाली आली आहे. गतवर्षी जूनच्या याच कालावधीत २५ टक्के साठा असल्याने प्रशासनाकडे काही दिवसांचा दिलासा होता. मात्र, यंदा हा साठा २०.२६ टक्क्यांवर आल्यामुळे संकट गहिरे झाले आहे. उपलब्ध पाणीसाठा पुढील महिनाभर पुरवणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
-------------
पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांविरोधी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. गाड्या धुणे, अंगणात पाणी मारणे, तसेच पिण्याच्या पाण्याचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मुख्य जलवाहिन्यांवरील गळती रोखण्यासाठी आणि अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने विशेष पथके तैनात केली आहेत.
-------------
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाण्याचा थेंब अन् थेंब जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. "जोपर्यंत धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत नाही आणि पाणीसाठा वाढत नाही, तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे. घरामध्ये पाण्याचा पुनर्वापर करावा आणि कोणत्याही परिस्थितीत पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी," असे आवाहन पालिकेच्या मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी केले आहे.
-----------------
Advertisement Slot