पुणे महापालिकेच्या मुख्यसभेत गदारोळ; पाणीटंचाईवरील चर्चा अर्धवट, दर्ग्यावरील कारवाईच्या मुद्यावरून वाद
Main Admin/Jun 18, 2026, 03:03 AM IST
Article link copied
पुणे, १७ जून: शहरातील गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेली पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी गोंधळात तहकूब करण्यात आली. पाणीपुरवठा कपात, नागरिकांच्या तक्रारी आणि उपाययोजनांवर चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नगरसेवक गफूर पठाण यांनी बोपोडी येथील दर्ग्यावर झालेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला आणि अखेर सभा तहकूब करण्यात आली. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय लागू केला आहे. मात्र, नियोजित वेळेत पाणी न मिळणे, गढूळ पाणी येणे आणि अनेक भागांत अपुरा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी मुख्यसभेत पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विविध पक्षांच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागांतील समस्या मांडत प्रशासनाकडून उत्तरांची मागणी केली. गफूर पठाण यांनी दर्ग्याचा विषय काढताच वातावरण तापले कोंढवा मतदारसंघाचे नगरसेवक गफूर पठाण हे आपल्या भागातील पाणीटंचाईबाबत बोलत असताना त्यांनी अचानक बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेने केलेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत “पाण्याच्या विषयावरच बोला” अशी मागणी करत त्यांच्या आसनाकडे धाव घेतली. यावेळी पठाण यांनी हातात तिरंगा ध्वज घेत संविधानाने आपल्याला मत मांडण्याचा अधिकार दिल्याचे सांगत बोलणे सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वातावरण अधिक तापले आणि भाजपचे नगरसेवक सुनील पांडे, रवींद्र साळेगावकर आणि व्यंकोजी खोपडे यांनी त्यांना शांत बसण्यास सांगितले. घटनेनंतर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी महापौर मंजूषा नागपुरे यांच्याकडे तक्रार नोंदवत सभागृहात अशा प्रकारची “गुंडगिरी” सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला. दरम्यान, सभागृहनेते गणेश बिडकर यांनी सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. गोंधळ वाढत गेल्याने अखेर सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. ६० लाख पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न राहिला अनुत्तरित सभेत जवळपास २० नगरसेवकांनी पाणीटंचाईवरील समस्या, नागरिकांच्या अडचणी आणि संभाव्य उपाययोजना मांडल्या होत्या. गफूर पठाण यांच्या भाषणानंतर केवळ तीन नगरसेवकांचे बोलणे बाकी असतानाच गदारोळ झाला. परिणामी, प्रशासनाकडून अपेक्षित स्पष्टीकरण आणि पुढील नियोजनाबाबत चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे शहरातील सुमारे ६० लाख नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकला. विरोधकांचा निषेध, आंदोलनाचा इशारा घटनेनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नगरसेवकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजपवर सभागृहातील लोकशाही परंपरांचा अवमान केल्याचा आरोप केला. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सांगितले की, पुणे महापालिकेच्या सभागृहाला समृद्ध लोकशाही परंपरा लाभली असून बहुमताच्या जोरावर विरोधी सदस्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या घटनेमुळे महिला नगरसेविकांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.