विद्यार्थी-पालकांची चिंता वाढली; संगवी केसरी कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक
Article link copied

पिंपरी-चिंचवडमधील शिक्षणाचे प्रमुख केंद्र असलेल्या 'संगवी केसरी महाविद्यालया'च्या प्रवेश प्रक्रियेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. बारावीचे निकाल लागून बराच काळ लोटला असला, तरी महाविद्यालय प्रशासनाने अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली नाही. या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण पसरले असून, यावर आता काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हा प्रश्न अत्यंत गंभीर वळणावर येऊन पोहोचला आहे. विशेषतः मोहन नगर, चिंचवड, दत्तनगर आणि विद्यानगर परिसरातील गरीब, गरजू आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय शिक्षणाचा मोठा आधार आहे. महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला हा पेच आता सोडवण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुणे विद्यापीठात धाव घेतली.
शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर परिस्थितीची माहिती दिली आणि तातडीने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, "महाविद्यालयीन शिक्षणासाठी हे महाविद्यालय गरीब विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आज आम्ही प्रभारी कुलगुरूंची भेट घेतली आहे, तर सोमवारी स्वतः कुलगुरू श्री. सुरेश गोसावी यांची भेट घेऊन या प्रकरणाचा ठोस पाठपुरावा करणार आहोत."
या भेटीदरम्यान, विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने प्रभारी कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी स्पष्ट केले की, महाविद्यालयाला या विलंबामुळे आधीच 'कारणे दाखवा' (Show Cause) नोटीस बजावण्यात आली आहे. लवकरच यावर तोडगा काढून प्रवेश प्रक्रिया पूर्ववत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
आता विद्यापीठ प्रशासनाची ही कारवाई विद्यार्थ्यांसाठी किती वेळेत फलदायी ठरते आणि संगवी केसरी महाविद्यालय आपली प्रवेश प्रक्रिया कधी सुरू करते, याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
Advertisement Slot