
पिंपरी – हलाखीच्या परिस्थितीवर मात देत पिंपरी चिंचवडच्या नेहरूनगर भागातील प्रज्ञा अजय दुबे हिने ‘चार्टर्ड अकाउंटंट’ (सीए) परीक्षेत देशात २४वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. लहान वयातच वडिलांचे छत्र हरवले घरची परिस्थिती कठीण असूनही तिला आई आणि मोठ्या बहिणीचा अखंड पाठिंबा आणि स्वतःची जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर पिंपरी चिंचवड शहरातील प्रज्ञाने सीए परीक्षेत उल्लेखनीय काम केल्यामुळे प्रज्ञाचे शहरातून कौतुक केले जात आहे.
प्रत्येकालाच प्रज्ञाने केलेल्या कामगिरीचे कौतुक वाटेल असे काम तिने केले आहे.आई अनिता दुबे आणि मोठी बहिण प्राची यांनी पाहिलेले स्वप्न आज प्रज्ञाने वास्तवात उतरवले आहे. निकाल समजल्यानंतर दोघींच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले होते.
३ नोव्हेंबर २०२५ रोजी घोषित झालेल्या सीए परीक्षेच्या निकालात प्रज्ञा दुबेने ६०० पैकी तब्बल ४४२ गुण मिळवत देशात २४ वा क्रमांक मिळवला. पिंपरी चिंचवडमधील मासुळकर कॉलनीत राहणारी प्रज्ञा ही शहरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण एस.एस. अजमेरा शाळेत, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सेंट उर्सुला शाळेत पूर्ण झाले. दहावीमध्ये ९० टक्के, तर बारावीमध्ये ९३ टक्के गुण मिळवले होते. विशेष म्हणजे, बारावीच्या अकाउंट्स विषयात प्रज्ञाने १०० पैकी १०० गुण मिळवत उज्ज्वल शैक्षणिक कारकीर्दीची नांदी वाजवली होती. पदवीचे शिक्षण तिने पिंपरीतील एम.यू.सी.सी. महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पूर्ण केले.
प्रज्ञाचे वडील अजय दुबे हे भोसरी एमआयडीसी येथील कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. १५ डिसेंबर २००३ रोजी मध्यरात्री कामावरून घरी परत येताना झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या वेळी प्रज्ञा अवघी तीन महिन्यांची होती. त्यानंतर घराची सर्व जबाबदारी आई अनिता दुबे यांच्या खांद्यावर आली.
अनिता दुबे सध्या एका कंपनीत परचेस ऑफिसर म्हणून कार्यरत असून, मोठी मुलगी प्राची आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. आईने अपार संघर्ष करीत दोन्ही मुलींना उत्तम शिक्षण दिले. मोठी मुलगी इंजिनिअर बनवायचे स्वप्न अपूर्ण राहिले, परंतु लहान मुलगी सीए व्हावी हे स्वप्न मात्र त्यांनी पूर्णत्वास नेले.
आज प्रज्ञाने केलेल्या कामगिरीचे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे प्रज्ञाच्या या यशाला चालताबोलता न्यूज टीम कडून शुभेच्छा प्रज्ञाच हे यश प्रत्येक विद्यार्थाला प्रेरणादायक ठरेल हे नक्की.
