पिंपरी-चिंचवडमधून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. तब्बल ७० पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे अंगावर असलेला आणि थेट पोलिसांवरच फायरिंग करून पळून जाणाऱ्या एका अट्टल आणि मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. शेखर संभाजी जाधव असे या अटक करण्यात आलेल्या २५ वर्षीय आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत फिल्मी आहे. १३ मे २०२६ रोजी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी शेखर जाधव आणि त्याच्या इतर ३ साथीदारांनी फायरिंग करून खुनाचा प्रयत्न केला होता आणि तेव्हापासून ते फरार होते. याप्रकरणी दिघी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. यानंतर १६ मे २०२६ रोजी गुन्हे शाखेचे पथक या मुख्य आरोपीचा माग काढत रांजणगाव येथे पोहोचले. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपी शेखर जाधव आणि मुस्तफा उर्फ भाईजान यांनी त्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकावरच थेट फायरिंग केले. या गोळीबारानंतर आरोपींनी उसाच्या शेताचा फायदा घेतला आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांवर फायरिंग करून पळालेल्या या आरोपीला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी तपासाची चक्रे फिरवली. पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत आणि विनोद वीर यांनी थेट नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांमध्ये तीन वेळा जाऊन तपास केला. तिथे स्वतःचे गोपनीय बातमीदार तयार केले आणि आरोपी शेखर जाधवची माहिती काढली. अखेर १४ जून २०२६ रोजी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास आरोपी शेखर जाधव हा दिघीतील मोझे शाळेजवळील मोकळ्या मैदानात येणार असल्याची पक्की माहिती तांत्रिक तपासावरून मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते यांच्या पथकाने तात्काळ या परिसरात सापळा रचला आणि आरोपीला हत्यारांसह रंगेहात ताब्यात घेतले. आरोपी शेखर जाधवला शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी दिघी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे परिसरातील मोठ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.