भोसरी, यमुनानगर रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी 'लकी ड्रॉ'द्वारे कंत्राट; ४.१४ कोटी मंजूर
Article link copied
 पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय आणि यमुनानगर रुग्णालयाच्या दैनंदिन साफसफाईसाठी तब्बल ४ कोटी १४ लाख २१ हजार ८०९ रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कंत्राटासाठी अनेक कंपन्यांनी समसमान दर सादर केल्यामुळे, अखेर 'लकी ड्रॉ' (सोडत) काढून 'मे. बी.व्ही.जी. इंडिया लि.' या कंपनीची निवड करण्यात आली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मूळ वेतन आणि विशेष भत्त्यावर ३ टक्के सेवाशुल्क दराने निविदा मागवल्या होत्या. या प्रक्रियेत एकूण ११ कंत्राटदारांनी भाग घेतला. दोन कंपन्यांनी १ टक्के दर दाखवल्याने त्या अपात्र ठरल्या, तर उर्वरित ७ कंत्राटदारांचे दर तंतोतंत ३ टक्के म्हणजेच समान आले. अखेर महापालिकेने लॉटरी (सोडत) काढली. ज्यामध्ये 'बीव्हीजी' कंपनीचे हे कंत्राट मिळाले. या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. १ सुपरवायझर आणि ६१ कामगार रुग्णालयात या कामासाठी नियुक्त केले जातील. कंत्राटदार कंपनीला स्वतःची अत्याधुनिक उपकरणे, रसायने आणि यंत्रसामग्री वापरून कॉरिडॉर, पार्किंग, ड्रेनेज लाईन आणि स्वच्छतागृहांची दैनंदिन स्वच्छता करावी लागणार आहे.
Advertisement Slot