कचरा नियमांची सक्तीव दंडात्मक कारवाई रोखा: सोसायटीधारकांसाठी आमदार शंकर जगतापांनी घेतली आयुक्तांची भेट
Article link copied
पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste Generators) घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नियमांची व्यवहार्यता न तपासता थेट दंडात्मक कारवाई केल्यास नागरिकांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण निर्माण होऊ शकते, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले आहे. महापालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत गृहनिर्माण सोसायट्या व व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत जनभावना प्रशासनासमोर मांडल्या. आमदार जगताप यावेळी म्हणाले, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महापालिकेचे पाऊल स्वागतार्ह आहे. मात्र, या नियमांच्या अंमलबजावणीबाबत नागरिक, गृहनिर्माण संस्था (सोसायट्या) आणि व्यावसायिक आस्थापना यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम, अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झाला आहे. अनेक गृहनिर्माण संस्थांना 'BWG' म्हणून लागू होणाऱ्या निकषांची, आवश्यक तांत्रिक सुविधांची आणि आर्थिक तरतुदींची पुरेशी माहिती उपलब्ध झालेली नाही. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत अडचणी येत असून, सोसायट्यांकडे ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक जागा, तांत्रिक मनुष्यबळ व आर्थिक क्षमता उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत थेट दंडात्मक किंवा फौजदारी कारवाईचा बडगा उचलल्यास नागरिकांमध्ये नकारात्मक भावना वाढीस लागेल, अशी भीती आमदारांनी व्यक्त केली आहे.
Advertisement Slot