चालता बोलता न्यूज

Search Everything

कथक गुरू पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांचा महापालिकेत मानपत्र देऊन गौरव

Main Admin / Jun 16, 2026, 01:27 PM IST

Article link copied


पिंपरी, दि. १५ जून (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथक नर्तक पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या महापालिकेच्या धोरणानुसार हा सन्मान सोहळा पार पडला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. कपोते म्हणाले, "ज्या शहरात माझे बालपण गेले, ज्या मातीत मी वाढलो आणि घडलो, त्या पिंपरी-चिंचवड शहराकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. महापालिकेने कलाकारांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून यामुळे युवा पिढीला कलेच्या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल."

या सोहळ्याला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, तसेच अनिल घोलप, अर्चना करांडे, सुलभा उबाळे, प्रा. उत्तम केंदळे, शत्रुघ्न काटे, योगेश बहल, नगरसचिव मुकेश कोळप, उप-आयुक्त अण्णा बोदडे आणि अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर मानपत्राचे वाचन विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

सांस्कृतिक विश्वातील अद्वितीय योगदान

डॉ. पंडित नंदकिशोर कपोते यांनी कथक नृत्यकलेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे वैभव जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले पुरुष कथक नर्तक आहेत. त्यांच्या या अढळ योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 'संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार' देऊन गौरवले आहे. सध्या ते 'नंदकिशोर कल्चरल सोसायटी'च्या माध्यमातून नृत्यकलेचे संवर्धन आणि प्रचार-प्रसाराचे मोलाचे कार्य करत आहेत.

Advertisement Slot