पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई, गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या: ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Article link copied

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी कारवाई करत गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना जेरबंद केले आहे. १८ जून २०२६ रोजी चाकण परिसरात गस्त घालत असताना, अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना खंडोबा माळ, रुबी बेकरी जवळ संशयास्पद हालचाली दिसल्या. या वेळी पोलिसांनी अनिकेत राजेंद्र बिरंगळ आणि कुशल उद्धव पाठक या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा जप्त केला आहे, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत ४१ लाख ९८ हजार रुपये इतकी आहे. अमली पदार्थांसोबतच पोलिसांनी १५ लाख रुपयांची एक स्कॉर्पिओ गाडी, ७५ हजार रुपयांचे तीन मोबाईल आणि ५१० रुपये रोख रक्कम असा एकूण ५७ लाख ७३ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे करत आहेत.
ही महत्त्वपूर्ण कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि बसवराज तेली, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांच्या विशेष पथकाने हे यश मिळवले आहे.
शहरातील अंमली पदार्थांचे जाळे मोडून काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर तुम्हाला अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास, तात्काळ अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या ८६००००२३२० या क्रमांकावर किंवा पोलीस हेल्पलाईन ११२ वर संपर्क साधावा. आपली माहिती गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Advertisement Slot