पर्यटकांसाठी खुशखबर: आता अवघ्या ५०० रुपयांत 'पिंपरी-चिंचवड दर्शन'
Article link copied

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमधील ऐतिहासिक वारसा, संस्कृती आणि विज्ञानाचा अद्भुत संगम आता पर्यटकांना अगदी सहज आणि परवडणाऱ्या दरात अनुभवता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पर्यटकांसाठी 'पुणे दर्शन'च्या धर्तीवर ' पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन' (बससेवा क्र. २) ही विशेष वातानुकूलित (AC) पर्यटन बससेवा सुरू केली आहे. या विशेष सेवेचे तिकीट अवघे ५०० रुपये ठेवण्यात आले असून, १० जून २०२६ पासून ही सेवा प्रवाशांच्या दिमतीला अधिकृतपणे दाखल झाली आहे.
चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी २७ मे २०२६ रोजी पीएमपी प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीत ही बससेवा तातडीने सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्थानिक पर्यटनाला चालना देण्याच्या' आवाहनातून प्रेरणा घेऊन शहराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रवाशांच्या सेवेसाठी ही बससेवा दाखल होणार आहे. यामुळे आता पर्यटकांना अवघ्या ५०० रुपयांत शहरांतील समृद्ध वारसा, संस्कृती आणि पर्यटन वैभव जवळून अनुभवता येणार आहे.
सार्वजनिक बससेवेच्या माध्यमातून शहरातील पर्यटनाला चालना मिळावी, अशी सूचना त्यांनी केली होती. या सूचनेची दखल घेत पीएमपी प्रशासनाने तातडीने या सेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ही सहल धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक अशा सर्व पैलूंचा संगम आहे. या एका दिवसाच्या सहलीत सर्व वयोगटातील पर्यटकांना विज्ञान, इतिहास आणि निसर्गाचा अनुभव घेता येईल. या सहलीचे बुकिंग करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग देखील सुरू करण्यात येणार आहे.
----------------
बस सुटण्याची वेळ आणि ठिकाण
· पुणे स्टेशन डेपो: येथून पहिली बस सकाळी ७:४५ वाजता सुटेल आणि सायंकाळी ७:०० वाजता पर्यटकांना घेऊन परत येईल.
· डेक्कन जिमखाना बस स्थानक: येथून दुसरी बस सकाळी ८:०० वाजता सुटेल आणि सायंकाळी ६:३० वाजता परत येईल.
----------------
'ही' प्रमुख प्रेक्षणीय स्थळे
पिंपरी-चिंचवडचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक केंद्र.
1. सायन्स पार्क (चिंचवड): विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमींसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र (सोमवारी बंद).
2. इस्कॉन मंदिर (रावेत): भव्य आणि शांततापूर्ण धार्मिक स्थळ.
3. चाफेकर बंधू स्मारक (बाह्य दर्शन): क्रांतीकारकांच्या स्मृतींना उजाळा देणारे राष्ट्रीय स्मारक.
४. चिंचवडचे महासाधू श्रीमन मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा.
-----------------
गाईडची सुविधा आणि आरामदायी प्रवास
या प्रवासादरम्यान केवळ प्रेक्षणीय स्थळे दाखवली जाणार आहेत. तर त्या स्थळांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व पर्यटकांना नीट समजावे यासाठी पीएमपी प्रशासनाकडून बसमध्ये एका विशेष गाईडची (मार्गदर्शक) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, हा प्रवास संपूर्णपणे वातानुकूलित (AC) बसेसमधून होणार असल्याने उन्हाळा किंवा पावसाळा अशा कोणत्याही ऋतूत पर्यटकांना अत्यंत आरामदायी अनुभव मिळेल.
----------------
कोट
पिंपरी-चिंचवड या शहराला मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभला आहे. हा समृद्ध वारसा नागरिकांना, विशेषतः तरुण पिढीला आणि पर्यटकांना एकाच प्रवासात अनुभवता यावा, हा यामागील मुख्य उद्देश होता. अवघ्या ५०० रुपयांत 'पिंपरी दर्शन' ही विशेष बससेवा सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात पर्यटन करता येईल या सुविधेमुळे शहरातील पर्यटनाला निश्चितच एक नवी चालना मिळेल आणि नागरिक याचा मोठ्या संख्येने लाभ घेतील, असा मला विश्वास आहे."
-शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा
Advertisement Slot