पुनावळेतील जागेआडून महापौरांचा डाव; चिंचवड, आकुर्डी, कासारवाडीतील शैक्षणिक भूखंड खासगी शिक्षण सम्राटांच्या घशात!
Article link copied
शैक्षणिक भुखंड एका खाजगी शिक्षण सम्राटाच्या घशात घालत ३० वष॔ भाडेकरार देण्याचा प्रस्ताव सोमवारी सर्वसाधारण सभेत ठेवला होता. सव॔ पक्षीय विरोध डावलून हा विषय मंजूर करण्यात आला. त्या विषयास उपसुचना देत चिंचवड, आकुर्डी आणि कासारवाडी येथील महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे तीन मोक्याचे शैक्षणिक भूखंड खासगीकरणाच्या नावाखाली शिक्षण सम्राटांच्या घशात घालण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सर्वपक्षीय विरोध डावलून महापौरांनी उपसूचनेद्वारे या जागांच्या खासगीकरणाला मंजुरी दिली असून, यामुळे शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेच्या मुख्य सभेत पुनावळे येथील एका जागेबाबत चर्चा सुरू असताना, सत्ताधार्यांकडून तीन आणखी उपसूचना मांडली. या उपसूचनेच्या आडून चिंचवड, आकुर्डी आणि कासारवाडी येथील तीन महत्त्वाच्या शैक्षणिक भूखंडांचे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव मंजुर करून घेतला. विरोधकांनी या प्रस्तावाला जोरदार आक्षेप घेतला होता. महापालिकेच्या हक्काच्या जागा आणि त्यावर उभारल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांसाठी असणे गरजेचे असताना, त्या थेट खासगी संस्थांच्या स्वाधीन केल्या जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. महापालिका स्वतः शाळा आणि शैक्षणिक संकुले चालवण्यास सक्षम असताना, मोक्याचे भूखंड खासगी शिक्षण संस्थांना का दिले जात आहेत?" असा संतप्त सवाल विरोधकांनी उपस्थित केला. मात्र, विरोधकांचा कोणताही आवाज ऐकून न घेता, संख्याबळाच्या जोरावर हा वादग्रस्त प्रस्ताव मंजूर करण्यात आला. चिंचवड, आकुर्डी आणि कासारवाडी हे शहरातील मध्यवर्ती आणि विकसित भाग आहेत. येथील जागांचे बाजारमूल्य कोट्यवधी रुपयांचे आहे. हे भूखंड खासगी शिक्षण सम्राटांच्या ताब्यात गेल्यामुळे भविष्यात येथे सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण घेणे परवडणारे राहणार नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. पुनावळेच्या जागेचे निमित्त करून महापौरांनी खेळलेल्या या राजकीय डावामुळे महापालिकेचे मोठे नुकसान झाल्याची चर्चा आता रंगली आहे. कासारवाडीतील सार्वजनिक सुविधा क्षेञ हे अक्षरविश्व ज्ञानसंकुल उभारणी करण्यासाठी भाडेतत्वावर देण्यात आले आहे. आनंदग्राम सामाजिक सेवाभावी संस्थेला ३० वर्षासाठी जागा दिली आहे. आकुर्डीतील डाॅ. डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटी यांना भाडेपट्टा करार आणखी ३० वर्षासाठी मुदतवाढ देण्यास मंजुर करण्यात आली आहे. चिंचवड परिसरात कलारंग प्रतिष्ठान या संस्थेला देखील जागा भाड्याने देण्यात येणार आहे. या जागेवर ललित कला केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे. तसेच पुनावळे येथील सव्वा दोन एकरच्या भूखंडावर शाळेचे आरक्षण असताना तो खासगी संस्थेला भाडेतत्वावर देण्याला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने सोमवारी (दि. १५) मान्यता दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे होते. या विषयाला मंजुरी न देता महापालिकेने स्वतः या जागेवर शाळा विकसित करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. महापालिकेच्या ताब्यात असलेली जागा खासगी शैक्षणिक संस्थेच्या घशात घालत असताना याला सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला. मात्र, सर्वांचा विरोध झुगारत सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी हा विषय मंजूर करण्याची सूचना केली. अखेर महापौरांनी या विषयाला मंजुरी देत पालिकेच्या ताब्यात असलेला भूखंड खासगी संस्थेला आंदण देण्यास मान्यता दिली. महापालिकेने मंजूर विकास आराखड्यात पुनावळे येथील सर्वे क्र. ३८ पै. व ४४ पै. मधील सुमारे ०.९१ हेक्टर (अंदाजे २ एकर, ११ गुंठे) जागा विकास आराखड्यात माध्यमिक शाळेसाठी आरक्षित आहे. ही जागा सध्या महापालिकेच्या ताब्यात आहे. पुनावळेतील हा भूखंड महापालिकेने स्वतःची माध्यमिक शाळा उभारण्यासाठी आरक्षित ठेवला होता. हा भूखंड आता एका खासगी शिक्षण संस्थेला देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडून निविदा प्रक्रियाही राबविली. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे आणि एका विशिष्ट संस्थेला डोळ्यासमोर ठेवून राबवल्याचाही आरोप आहे. ज्या जागेवर पालिकेने स्वतः शाळा उभारणे गरजेचे होते. ती जागा खासगी संस्थेला देण्यास मोठ्या प्रमाणात विरोध आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेनंतर मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे होता. त्यास मोठ्या प्रमाणात विरोध झाला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकांनी देखील याला कडाडून विरोध केला.
Advertisement Slot