रावेत पोलिसांची मोठी कारवाई: चैन स्नॅचरला अटक, ६ गुन्हे उघडकीस; २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
Article link copied

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील रावेत पोलिसांना मोठी यश मिळाले आहे. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले असून, त्याच्याकडून एकूण ६ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ जून २०२६ रोजी एका महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण चोरल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन फटांगरे यांनी तपासाचे आदेश दिले. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलीस पथकाने आदित्य परशुराम मनलोर (वय १९ वर्षे) याला अटक केली. सखोल चौकशीत त्याने त्याचा साथीदार फिदा मनुआली इराणी (वय ३५ वर्षे) याच्यासोबत मिळून रावेत परिसरात दोन चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. या आरोपीकडून एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यामध्ये ५ जबरी चोरीचे (चेन स्नॅचिंग) गुन्हे आणि १ दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा समावेश आहे.
पोलीस पथकाने कारवाई करत आरोपींकडून तब्बल २ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांसह, कर्नाटक पासिंगची एक महागडी दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे.
Advertisement Slot