संकटाची चाहूल; पिंपरी-चिंचवडमधील सर्व जलतरण तलाव बंद होणार
Article link copied
महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला आदेश; पाण्याच्या अपव्ययावर कडक कारवाई करा
पिंपरी : एल निनोच्या संभाव्य परिणामामुळे यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना पिंपरी-चिंचवड शहरात पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर रवी लांडगे यांनी शहरातील सर्व महापालिका जलतरण तलाव तातडीने बंद करण्याची घोषणा केली. तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्या खासगी स्विमिंग पूल, वाहन धुलाई केंद्रे, बांधकाम प्रकल्प आणि इतर आस्थापनांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
महापौर लांडगे यांनी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना पत्राद्वारे पाणी बचतीसाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. २५ जूनपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास शहरात पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागू शकतो, अशी शक्यता त्यांनी सभागृहात व्यक्त केली. त्यामुळे संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच पाणी बचतीचे नियोजन करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात सुमारे २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा तो केवळ २१ टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे एल निनोमुळे पावसाचे आगमन लांबण्याची शक्यता असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
महापौरांनी नागरिकांनाही पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले. "पाणी ही अमूल्य संपत्ती असून प्रत्येक थेंब वाचविणे ही काळाची गरज आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाणी बचतीचे नियम पाळल्यास संभाव्य पाणीटंचाईचे संकट टाळता येईल," असे त्यांनी सांगितले. महापालिकेकडून लवकरच विशेष तपासणी मोहीम राबवून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरात जलसंधारण आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांना अधिक गती मिळण्याची चिन्हे आहेत.
Advertisement Slot