चालता बोलता न्यूज

Search Everything

शिक्रापूरमधील ट्रिनिटी इंडिया फोर्जटेकवर कामगारांचा एल्गार; वेतनवाढ आणि हक्कांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू

Main Admin / Jun 22, 2026, 04:24 PM IST

Article link copied

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या 'ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रा. लि.' या कंपनीत आजपासून कामगारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी फोर्जिंग व मशिनिंग उत्पादन करणाऱ्या या प्रमुख कंपनीमध्ये शिवगर्जना कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले असून, यामुळे कंपनीच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात वेतनवाढ करार, सेवा अटी व इतर महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा सुरू होती. कामगारांनी सातत्याने पत्रव्यवहार करून आणि सामोपचाराने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यवस्थापनाकडून कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अखेर, कोणताही ठोस निर्णय न मिळाल्याने कामगारांनी लोकशाही मार्गाने बेमुदत संपावर जाण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.
कामगारांनी आपल्या मागण्या मांडताना प्रामुख्याने सन्मानजनक वेतनवाढ करार, वाढत्या महागाईच्या दराचा विचार करून वेतनात केलेली सुधारणा, कंत्राटी व कायम कामगारांमध्ये समानतेचे धोरण राबविणे, कामगारांना त्यांचे कायदेशीर हक्क व सुविधा प्रदान करणे, तसेच कारखान्यामध्ये अधिक सुरक्षित व आरोग्यदायी कामाचे वातावरण उपलब्ध करून देणे, या मुद्द्यांवर भर दिला आहे.
याबाबत बोलताना शिवगर्जना कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा बेंद्रे यांनी सांगितले की, आम्ही सुरुवातीपासूनच व्यवस्थापनाशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच नाइलाजाने कामगारांना या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. जोपर्यंत वेतनवाढ करार आणि इतर मागण्यांबाबत समाधानकारक तोडगा निघत नाही, तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.

Advertisement Slot