चालता बोलता न्यूज

Search Everything

दिघी गावातील डी.पी. रोड कामात गैरव्यवहार - महापालिकेतील कोट्यवधींचा निधी खर्च

Main Admin / Jun 18, 2026, 06:50 AM IST

Article link copied

पिंपरी - 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील दिघी गाव परिसरात सुरू असलेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमितता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

दिघी गावातील सर्व्हे नंबर ७२, ८४, ६९ आणि ८७ येथील डी. पी. रोडच्या (विकास योजना रस्ता) विकास कामांमध्ये महापालिकेच्या निधीचा प्रचंड अपव्यय करण्यात आला असून, यामध्ये दुबार निविदा प्रक्रिया राबवणे, निकृष्ट दर्जाचे काम करणे आणि कामे अपूर्ण असतानाही कंत्राटदाराला कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते समीर पाचरणे यांनी केला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे पाचरणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  दिघी गाव परिसरातील सर्व्हे नं. ७२, ८४, ६९ आणि ८७ मधून जाणाऱ्या डी. पी. रोडच्या कामासाठी महापालिकेच्या वतीने निविद्रा क्रमांक ५२/1/2021-2022 राबवून याकरिता ४ कोटी, १४ लाख ९१ हजार ४९३ निधी मंजुर केला होता. या कामासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या सर्व्हें नं. १२ मीटर आणि १५ मीटर रुंदीचा तसेच ९५० मीटर लांबीचा रस्ता विकसित करणे अपेक्षित होते.

निविदेप्रमाणे स्ट्रॉम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा लाईन, स्ट्रीट लाईट, केबल टाकणे, बी.बी.एम करुन हॉटमिक्स डांबरीकरण करणे, फुटपाथ बांधणे, सी.डी.वर्क, तसेच एल-सेक्शन व क्रॉस सेक्शननुसार रस्ता विकसित करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात सदरचे काम निकृष्ट दर्जाचे व अपुर्ण केले आहे. केवळ घाईघाईने डांबरीकरण करुन रनिंगचे बिले काढण्यात आली आहे.

या कामाची मोजमाप पुस्तिका, शेड्युल बिलाची मागणी करुन दिलेली नाही. प्रत्यक्षात १२ व १५ मीटर रुंदीऐवजी अंदाजे ९ मीटर रुंदीचा व सुमारे ७०० मीटर लांबीचा रस्ता करण्यात आलेला आहे.   

एकत्रित निविदा प्रक्रिया राबवून रस्त्याची तुकडे-तुकडे कामे करत करोडो रुपयाची बोगस बिले काढण्यात येत आहे. स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराशी संगनमत करून पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकण्यासाठीच हा दुबार निविदांचा डाव रचल्याचा थेट आरोप पाचरणे यांनी केला आहे. यामुळे महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीचा सर्रास अपव्यय झाला आहे.

---------------

निकृष्ट दर्जाचे काम आणि अपूर्ण रस्ते

दिघी परिसरात प्रत्यक्ष जमिनीवर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रस्त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्याचा दर्जा अत्यंत खालावलेला असून, काही महिन्यांतच हा रस्ता उखडण्यास सुरुवात झाली आहे. डांबरीकरण आणि खडीकरणाचे नियम पूर्णपणे धाब्यावर बसवले गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे तयार झालेलाच नाही. अनेक पॅचेस अपूर्ण अवस्थेत आहेत, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असे असतानाही अधिकाऱ्यांनी या कामांची कोणतीही प्रत्यक्ष पाहणी न करता कंत्राटदाराला पाठीशी घातले आहे.

--------------

काम अपूर्ण, तरीही बिलांची खिरापत

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे 'काम नाही तर दाम नाही' या नियमाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. सर्व्हे नंबर ७२, ८४, ६९ आणि ८७ मधील डी. पी. रोडचे काम प्रत्यक्षात अपूर्ण असताना, स्थापत्य विभागाच्या संबंधित अभियंत्यांनी कंत्राटदाराची बिले मंजूर केली. काम पूर्ण झाल्याचे दाखले तयार करून कंत्राटदाराला नियमबाह्य पद्धतीने आणि अत्यंत घाईघाईने बिले अदा करण्यात आली.

---------------

अभियंते आणि कंत्राटदारांचे साटेलोटे

या भ्रष्टाचाराला स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे पूर्ण अभय लाभले आहे. या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि अंतिम मंजुरी देणारे कार्यकारी अभियंता यांनी आपल्या कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार समीर पाचरणे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे केली आहे.

-----------------

चौकशी समिती गठीत करा

त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून एका स्वतंत्र उच्चस्तरीय समितीमार्फत या कामाची तांत्रिक व आर्थिक तपासणी करावी. तसेच दोषी कंत्राटदाराला ब्लकलिस्ट करावे, भ्रष्ट अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी समीर पाचरणे यांनी केली आहे. याबाबत महापालिकेने यावर तात्काळ पावले उचलली नाहीत, तर दिघी परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

-------------------------

दोन निविदा कामात करोडोचा घोळ

महापालिकेच्या दिघी परिसरात डी.पी. रस्त्याच्या कामातील निविदा क्र. ५२/१/२०२१-२२ आणि  निविदा क. ५३/०८/२०२३-२४ या कामात प्रचंड अनियमितता झाल्याचे तक्राराचे म्हणणे आहे. पहिली निविदा ४ कोटी १४ लाख ९१ हजाराची तर दुसरी निविदा १५ कोटी ५३ लाख ,१३ हजाराची ५६७ कामे काढण्यात आली होती. सदर कामे निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण करण्यात आले असून केवळ घाईघाईने डांबरीकरण करून रनिंग बिले काढण्यात आली आहेत. तसेच दिघी बौद्ध बिहार सी.एम.ई. भिंतीलगतचा डी.पी.रोड, साई पार्क येथील महानगरपालिका शाळेसमोरील रस्ता आणि ओम साई मिसळ ते गोल्फ क्लिप सोसायटीपर्यंतचा डी.पी. रोड ही सर्व कामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची असल्याचे प्रत्यक्ष स्थळ पाहणीत दिसून आली असून या कामासाठी बिले अदा करण्यात आलेली आहेत.

-------------

कोट

महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयातंर्गत दिघी परिसरातील डी.पी. रस्त्याच्या कामाच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. रस्ते तयार करण्यासाठी एकत्रित निविदा प्रक्रिया राबविली होती. सदरील डी.पी. रस्त्याची कामे ही जेवढे भूसंपादन प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. तेवढी कामे केलेली आहेत. त्यामुळे त्या रस्त्याची कामे अपुर्ण आहेत. या कामाच्या तक्रारीनूसार सदरील रस्त्याची प्रत्यक्षात पाहणी करुन तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करुन अहवाल स्थापत्य सहशहर अभियंता, शहर अभियंता व आयुक्तांकडे पाठवण्यात येणार आहे.

-शिवराज वाडकर, उपअभियंता, स्थापत्य विभाग, ई क्षेत्रीय कार्यालय,

Advertisement Slot