चालता बोलता न्यूज

Search Everything

वापरात नसलेल्या वस्तूंना नवे आयुष्य महापालिकेच्या आर.आर.आर. केंद्रांना नागरिकांची वाढती पसंती 

Main Admin / Jun 18, 2026, 07:49 AM IST

Article link copied

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘आर.आर.आर. (रिड्यूस, रियूज, रिसायकल)’ संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गेल्या एका महिन्यात शहरातील विविध भागांतून ४५३ वस्तूंचे संकलन करण्यात आले आहे. या वस्तूंचे एकूण वजन ६२८.७५ किलो इतके असून, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळत आहे. महापालिकेच्या या उपक्रमांतर्गत नागरिकांनी घरातील वापरात नसलेल्या, मात्र पुनर्वापरयोग्य वस्तू स्वेच्छेने आर.आर.आर. केंद्रांवर जमा केल्या. यामध्ये खेळणी, पुस्तके, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच विविध घरगुती वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंचा पुनर्वापर होण्यास मदत होत असून, कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याबरोबरच नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनालाही हातभार लागत आहे. आर.आर.आर. उपक्रमाच्या माध्यमातून ‘कमी वापरा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रण करा’ हा पर्यावरणपूरक संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे. या उपक्रमामुळे वस्तूंचा सुयोग्य वापर, पुनर्वापराची सवय आणि कचरा कमी करण्याबाबत जनजागृती होत असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभागही वाढत आहे. पर्यावरण संरक्षणासोबतच शाश्वत विकासाच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, आर.आर.आर. उपक्रमाला नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा पर्यावरण संवर्धनाबाबतची त्यांची जागरूकता दर्शवितो. पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाला प्रोत्साहन देत कचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक आणि शाश्वत करण्यासाठी महापालिका सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. नागरिकांचा हा सहभाग स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तर उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी नागरिकांना शहरातील आर.आर.आर. केंद्रांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. घरातील वापरण्यायोग्य वस्तू या केंद्रांवर जमा करून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे. ...... कोट पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण ही केवळ स्वच्छतेची संकल्पना नसून ती वसुंधरा संरक्षणाची प्रभावी चळवळ आहे. आर.आर.आर. उपक्रमामुळे वापरात नसलेल्या वस्तूंना नवे आयुष्य मिळत आहे आणि कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होत आहे. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून ‘कचऱ्यातून संसाधन’ निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ द्यावे. स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे.” — रवि लांडगे महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ..... कोट आर.आर.आर. केंद्रांद्वारे नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वापरात नसलेल्या वस्तू टाकून देण्याऐवजी त्या गरजूंपर्यंत पोहोचविणे आणि पुनर्वापरासाठी देणे ही काळाची गरज आहे. अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ व शाश्वत शहर निर्मितीत योगदान द्यावे. —डॉ. विजय सूर्यवंशी आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

Advertisement Slot