३४१ व्या आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केली पालखी मार्गाची पाहणी
Article link copied

पिंपरी चिंचवड : जगदगुरु श्री. संत तुकाराम महाराज यांचा ३४१ वा आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा आगामी ७ जुलै २०२६ रोजी पार पडणार आहे. हा सोहळा शांततेने आणि निर्विघ्नपणे पार पडावा, या उद्देशाने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी १ जुलै २०२६ रोजी पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. आपल्या दौऱ्याची सुरुवात त्यांनी देहू येथील मंदिर परिसरातून केली, जिथे त्यांनी संत तुकाराम महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष जालिंदर विश्वनाथ मोरे आणि विश्वस्त गणेश उत्तम मोरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान, पोलीस आयुक्तांनी पालखी सोहळ्याच्या नियोजनाची माहिती घेतली आणि गर्दीचे व्यवस्थापन व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्वांना आश्वस्त केले. यावेळी त्यांनी नव्याने तयार करण्यात येत असलेल्या पालखी रथाची पाहणी केली, तसेच गर्दी नियंत्रणासाठी मंदिराच्या परिसरात योग्य रितीने बॅरीकेटींग आणि दोरखंडांचा वापर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर आयुक्तांनी पालखी मार्गावरील विसाव्याची ठिकाणे जसे की अनगडशहाबाबा दर्गा आणि चिंचोलीगाव येथील श्री. शनि मंदिर येथे जाऊन पाहणी केली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पालखी मार्गाच्या नियोजनासाठी भक्तीशक्ती चौक, निगडी येथे त्यांनी पालिका आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये मनपाचे अतिरिक्त आयुक्त कुलदिप जंगम, उपायुक्त प्रदीप ठेंगल आणि महामेट्रोचे रेसिडंट इंजिनिअर यतेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. सध्या भक्तीशक्ती चौक ते मोरवाडी चौक दरम्यान सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला असून, मेट्रोचे मोठे कॉलम आणि बॅरीकेटींग पालखीच्या मार्गात अडथळा ठरत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस आयुक्तांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना बॅरीकेटींग आतमध्ये सरकवून मार्ग मोकळा करण्याच्या, आवश्यक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्याच्या आणि रस्ता समतल करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्याचबरोबर, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्यासाठी झाडांच्या फांद्या छाटणे, कमानी हटवणे आणि रस्त्यावरील राडारोडा उचलून मार्ग सुलभ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या पाहणी दौऱ्यात पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली तसेच पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, संदिप आटोळे, रोहीदास पवार, मारुती जगताप, धीरज पाटील आणि विक्रांत देशमुख हे वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी झाले होते. भक्तीमय वातावरणात हा पालखी सोहळा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Advertisement Slot