चालता बोलता न्यूज

Search Everything

अहमदाबादमध्ये महाराष्ट्राचा डंका! अदिती गाडेने जिंकली दोन सुवर्णपदके; सायकलिंग आणि पोहण्यात मारली बाजी

Main Admin / Jun 24, 2026, 05:49 AM IST

Article link copied


जिद्द, चिकाटी आणि मनाची तयारी असेल तर अशक्य काहीच नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे पुणे जिल्ह्यातील वाकड येथील अदिती गाडे हिने. अहमदाबाद येथे पार पडलेल्या १३ व्या सेरेब्रल पाल्सी आणि ऑटिझम राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अदितीने दोन सुवर्णपदके पटकावत महाराष्ट्रासह पिंपरी-चिंचवड शहराचे नाव देशभर उज्ज्वल केले आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथे ६ आणि ७ जून २०२६ रोजी ‘सेरेब्रल पाल्सी अँड ऑटिझम स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ आणि ‘सेरेब्रल पाल्सी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ गुजरात’ यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील २३ राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
अदितीने सायकलिंग आणि पोहणे या दोन्ही प्रकारांत आपले कौशल्य सिद्ध केले. ५०० मीटर सायकलिंग स्पर्धेत आपले अचूक संतुलन आणि वेग राखत तिने प्रथम क्रमांक पटकावला, तर ५० मीटर फ्रीस्टाईल पोहण्याच्या स्पर्धेतही दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
अदितीचा हा प्रवास केवळ क्रीडा यश नाही, तर तो एका संघर्षाचा विजय आहे. तीव्र ऑटिझम आणि अपस्मार (Epilepsy) यांसारख्या आव्हानांचा सामना करत असतानाही तिने हार मानली नाही. तिची ही जिद्द विशेष मुलांसाठी एक मोठे प्रेरणास्थान ठरली आहे.
या यशाबद्दल बोलताना 'उन्नती पीआरसी'च्या प्रतिनिधींनी सांगितले की, “अदिती अवघ्या एका वर्षाची असल्यापासून आम्ही तिचा विकासप्रवास पाहत आहोत. तिच्या वाढीचा एक भाग होण्याचे भाग्य आम्हाला लाभले. त्यामुळे तिचे हे यश आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि भावनिक आहे.”
आज अदितीच्या या कामगिरीचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाची शिखरे गाठणाऱ्या अदिती गाडेचे हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे.

Advertisement Slot