छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा कामात अनियमितता
Article link copied
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागवला चौकशी अहवाल
- आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशीकडून नगरविकास विभागाला केराची टोपली
पिंपरी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा बांधण्याचे काम सुरू आहे. या कामामध्ये मोठा गैरव्यवहार झाला असून त्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यांनी महापालिका आयुक्तांकडे याबाबत चौकशी अहवाल मागवला होता.
मात्र, आयुक्तांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आदेश केराची टोपली दाखवत अद्याप चौकशी अहवाल दिला नाही. कारण, चौथ्या टप्याच्या कामासाठी पुन्हा त्याच सल्लागाराची नियुक्ती करायची होती. त्याला स्थायी समितीमध्ये अध्यक्षांनी मान्यता दिली असून आम्ही विरोध नोंदवला आहे, अशी माहिती शिवसेनेच्या नगरसेविका तथा स्थायी समितीच्या सदस्या सुलभा उबाळे यांनी दिली.
मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या १०० फूट उंचीच्या भव्य पुतळा प्रकल्पावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. सुमारे ९२ कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पासाठी विविध टप्प्यांत निविदा काढण्यात आल्या असून आता चौथ्या टप्प्यासाठीही त्याच प्रकल्प सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि. १०) स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्याला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मान्यता दिली.
त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुलभा उबाळे यांनी गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, या प्रकल्पासाठी चौथरा, पुतळा उभारणी, सुशोभीकरण, स्थापत्य आणि विद्युत कामे अशा चार टप्प्यांमध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यांची एकूण रक्कम ९२ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. यापूर्वीच्या तीन टप्प्यांसाठी मे. क्रिएशन्स इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीला ०.९९ टक्के दराने पोस्ट टेंडर अॅक्टिव्हिटीसाठी मान्यता देण्यात आली होती. आता चौथ्या टप्प्यासाठीही त्याच कंपनीची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव होता.
मात्र, मे. धनेश्वर या ठेकेदाराला काम देण्याला आक्षेप आहे. त्याला पुतळा उभा करण्याच अनुभव नसताना रिंग करत हे काम देण्यात आले आहे. आता देखील सुशोभीकरणाच्या कामामध्ये ६५ टक्के काम विद्युत विभागाचे आहे. निविदा डिझाईन करत असताना विद्युतच्या कामासाठी ७० खांब डिझाईनमध्ये दाखवले आहे, असे असताना प्रत्यक्ष खरेदी १३० खांबांची केली आहे. असे अनेक प्रकार करत निविदा फुगवली आहे. त्यामधून सुमारे २० कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप उबाळे यांनी केला.
--
स्मारक समितीकडून ताबा मारण्याचा प्रयत्न?
छत्रपती संभाजी महाराज हे आराध्य दैवत असून त्यांच्या पुतळ्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने खर्च केला आहे. मात्र, काहींनी स्मारक समिती तयार करत त्याठिकाणी ताबा मारण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात हा प्रकल्प संस्थेला चालविण्यासाठी द्यायचा असेल तर त्यासाठी जागतिक स्वरुपाची निविदा काढली पाहिजे. कोणीही उठेल आणि हिंदू स्मारक समिती करून ताबा मारेल असे चालणार नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेने याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी उबाळे यांनी केली.
--------------
Advertisement Slot