हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा प्रवाशी सेवेचा मार्ग मोकळा पहिला टप्पात १२ स्थानकावरुन सेवा सुरु होणार
Article link copied
पुणे शहरासह हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी नागरिक ज्या क्षणाची चातकासारखी वाट पाहत होते, तो क्षण आता अगदी जवळ आला आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन-३ च्या कामाबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. या मार्गावरील पहिल्या १३.३ किलोमीटर टप्प्याचे बांधकाम जूनअखेर पूर्ण होणार आहे. आता प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, उद्घाटनाच्या तारखेचा चेंडू आता राज्य सरकारच्या कोर्टात गेला आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय या १३.३ किलोमीटर अंतरातील १२ स्थानकांचे काम जूनअखेर पूर्ण होणार आहे. या मार्गाच्या उद्घाटनाचा आणि प्रवासी सेवेचा निर्णय आता राज्य सरकार घेणार आहे. याबाबत ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्यात मेट्रो सुरू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात चार ते पाच स्थानके खुली होतील. मधली काही स्थानके वगळून जिल्हा न्यायालयापर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यातील काही स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. काही किरकोळ कामे राहिली असून ऑगस्टपर्यंत कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. डिसेंबरअखेरपर्यंत रेंजहिल्स आणि शिमला ऑफिस ही दोन स्थानके वगळून सर्व स्थानकांची कामे पूर्ण झालेली असतील. या दोन्ही मेट्रो स्टेशनच्या कामासाठी गणेशखिंड रस्ता दिवसा बंद करू शकत नाही. वाहतूक वळवता येणे शक्य नाही. दिवसा अवजड यंत्रणा हाताळताना अडचणी येत असल्यामुळे रात्री काम करावे लागते. स्टेशनचे काम करण्यासाठी खूप कमी वेळ मिळत आहे. त्यामुळे उर्वरित दोन स्थानकांचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.’’ पीएमआरडीएने जुलै २०२७ पर्यंत जरी मुदतवाढ मागितली, तरी सर्व कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सैनी यांनी सांगितले. या प्रसंगी ‘पीआयटीसीएमआरएल’चे मुख्य वृत्त अधिकारी मितूल जव्हेरी आणि मुख्य कार्यकारी व्यवस्थापक पराग पहूरकर उपस्थित होते.
Advertisement Slot