हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कंपनीला FDA ची 'कारणे दाखवा' नोटीस
Article link copied
- उत्पादन परवाने रद्द करण्याचा इशारा
पिंपरी प्रतिनिधी
पिंपरी येथील केंद्र सरकारच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातील औषध निर्मिती कंपनी 'हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड' सध्या मोठ्या कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणीत सापडली आहे. औषध निर्माण प्रक्रियेत अत्यंत गंभीर त्रुटी आढळल्यामुळे राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने कंपनीला थेट 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. या त्रुटींवर समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास कंपनीचे औषध उत्पादन परवाने निलंबित किंवा कायमचे रद्द करण्याचा स्पष्ट इशारा एफडीएने दिला आहे. यामुळे कंपनीच्या अस्तित्वावरच आता टांगती तलवार निर्माण झाली आहे.
एफडीएच्या पथकाने पिंपरी येथील या प्रकल्पाची पाहणी केली होती. या तपासणीत औषध निर्मितीच्या मानकांमध्ये आणि प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. सुरक्षिततेचा उपाय म्हणून एफडीएच्या सूचनेनुसार कंपनीने गेल्या दीड महिन्यांपासून आपले औषध उत्पादन तात्पुरते स्थगित केले आहे. उत्पादन बंद असतानाच आता एफडीएने थेट नोटीस बजावल्याने कंपनीच्या अडचणींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने या सर्व त्रुटींवर कंपनी प्रशासनाला आपले म्हणणे मांडण्यासाठी केवळ सात दिवसांची मुदत दिली आहे. या सात दिवसांत कंपनीने समाधानकारक आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य स्पष्टीकरण दिले नाही, तर कंपनीचे काही किंवा सर्व उत्पादन परवाने निलंबित अथवा रद्द केले जातील, असे एफडीएने नोटिसीत स्पष्ट केले आहे.
Advertisement Slot