कामशेतच्या आकाशावर ‘हायटेन्शन’चे सावट; प्रस्तावित ७६५ केव्ही वीजवाहिनीमुळे पॅराग्लायडिंग हिल धोक्यात
Article link copied
पिंपरी (प्रतिनिधी) - देशभरातील पॅराग्लायडिंगचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख असलेल्या मावळ तालुक्यातील कामशेत परिसरासमोर आता एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. प्रस्तावित ७६५ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीच्या मार्गातील तीन टॉवर मुख्य उड्डाण क्षेत्र आणि वैमानिकांच्या नियमित फ्लाइट पाथमध्ये येत असल्याने पॅराग्लायडिंगच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या मार्गात बदल न झाल्यास गेल्या तीन दशकांत विकसित झालेल्या या जागतिक दर्जाच्या साहसी क्रीडा केंद्राच्या भवितव्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कामशेतची भौगोलिक रचना, डोंगररांगा, उंची आणि अनुकूल वाऱ्याची परिस्थिती यामुळे हे ठिकाण भारतातील सर्वात महत्त्वाच्या पॅराग्लायडिंग केंद्रांपैकी एक मानले जाते. दरवर्षी हजारो पर्यटक, प्रशिक्षणार्थी वैमानिक आणि साहसी क्रीडाप्रेमी येथे येतात. मनोरंजनात्मक उड्डाणे, व्यावसायिक टँडेम फ्लाइट्स, वैमानिक प्रशिक्षण तसेच स्पर्धात्मक विमान क्रीडा उपक्रम येथे नियमितपणे आयोजित केले जातात. वर्षातील आठ ते नऊ महिने उड्डाणासाठी अनुकूल वातावरण असल्याने स्थानिक पर्यटन आणि रोजगारालाही मोठा आधार मिळतो. उड्डाण सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह पॅराग्लायडिंग क्षेत्राजवळ प्रस्तावित ७६५ केव्ही वीजवाहिनीचा मार्ग हा सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. पॅराग्लायडिंग क्षेत्रातील प्रमुख टेक-ऑफ पॉइंट आणि उड्डाण मार्गाच्या अगदी जवळ हे टॉवर प्रस्तावित असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरात पसरलेल्या या वीजवाहिनीमुळे उड्डाणांच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, उच्चदाब वीजवाहिन्या आणि टॉवरमुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता असून त्यामुळे प्रशिक्षण आणि पर्यटनाशी संबंधित उपक्रमांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. केंद्रीय विद्युत मंत्रालयाने दिले फेरसर्व्हे करण्याचे निर्देश या पार्श्वभूमीवर कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनने चिंता व्यक्त करत जनप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे हस्तक्षेपाची मागणी केली होती. त्यानंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय विद्युत मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल यांची भेट घेऊन वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी केली. केवळ तीन टॉवरसाठी ३० वर्षांपासून विकसित झालेल्या या महत्त्वपूर्ण विमान क्रीडा केंद्राचे नुकसान करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी बैठकीत नमूद केले. खासदार बारणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय विद्युत मंत्रालयाने या विषयाची गंभीर दखल घेत संबंधित खासगी कंपनीशी चर्चा करून फेरसर्व्हे करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच मुख्य उड्डाण क्षेत्राला बाधा न आणणारा पर्यायी मार्ग शोधण्याच्या शक्यताही तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता पॅराग्लायडिंग क्षेत्राशी संबंधित संस्था, पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष आगामी फेरसर्व्हे आणि अंतिम निर्णयाकडे लागले आहे. विकास प्रकल्प आणि क्रीडा-पर्यटन क्षेत्र यांच्यात समतोल राखत असा तोडगा निघावा, ज्यामुळे वीज प्रकल्पालाही गती मिळेल आणि कामशेतची राष्ट्रीय स्तरावरील पॅराग्लायडिंगची ओळखही अबाधित राहील.
Advertisement Slot