चालता बोलता न्यूज

Search Everything

महापालिकेत 10 क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना 1 जुलैपासून 2026 नवे आदेश लागू मनुष्यबळ वाटप व सुविधा उभारणीचे आयुक्तांचे आदेश 

Main Admin / Jun 24, 2026, 04:49 AM IST

Article link copied

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आठऐवजी दहा क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज स्वतंत्रपणे 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. नवीन ल आणि ज क्षेत्रीय कार्यालयासाठी क्षेत्रीय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्या दोन नवीन कार्यालयात आवश्यक दालने, कार्यालय, सभागृह व इतर व्यवस्था करून घेण्याचे आदेश आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत. सत्ताधारी भाजपने शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांची संख्या वाढवून दहा केली आहे. सर्व दहा ठिकाणी भाजपचे नगरसेवक अध्यक्ष होतील, अशा प्रकारे सत्ताधार्‍यांनी आठही क्षेत्रीय कार्यालयांची फोडाफोडी केली आहे. विरोधकांचा प्रचंड विरोध डावलून महापालिकेच्या 13 मार्चच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांनी ती उपसूचना मंजूर केली. तर, ती उपसूचना सुसंगत नसून, रद्द न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा विरोधकांनी 15 मे रोजीच्या सर्वसाधारण सभेत दिला होता. त्यामुळे सत्ताधार्‍यांवर जुनी उपसूचना रद्द करण्याची नामुष्की ओढवली. तर, आयुक्तांनाही दहा क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज 25 मे रोजीपासून सुरू करण्याचा 13 मे रोजी दिलेला आदेशही माघारी घ्यावा लागला होता. त्याच सभेत सत्ताधार्‍यांनी पुन्हा आठऐवजी दहा क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्याची सूचना मंजुरी केली होती. त्या उपसूचनेवर आयुक्तांनी आदेश काढले आहेत. --------------- अधिका-याकडे अतिरिक्त पदभार.. क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अतुल पाटील यांच्याकडे ल क्षेत्रीय कार्यालयाचे तर, ड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड यांच्याकडे ज क्षेत्रीय कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता सुनीलदत्त नरोटे यांची क क्षेत्रीय कार्यालय येथून ल क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांची ई क्षेत्रीय कार्यालयातून ज क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन क्षेत्रीय कार्यालये 1 जुलैपासून सुरू करण्यासाठी मध्यवर्ती भांडार, स्थापत्य, विद्युत, माहिती तंत्रज्ञान, पाणीपुरवठा, आरोग्य आणि अग्निशमन विभागांना आवश्यक सुविधा देवून काम करून घेण्याच्या त्या अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यालयांमध्ये फर्निचर, इंटरनेट, सीसीटीव्ही, वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता आणि अग्निसुरक्षा व्यवस्था तातडीने उभारण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ------------------- या ठिकाणी असणार आहेत क्षेत्रीय कार्यालये · अ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 13, 14 आणि 15 चा समावेश आहे. ते कार्यालय सध्याचे निगडी, प्राधिकरण येथील भेळ चौक येथेच असणार आहे. · ब क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमक 17, 18 आणि 19 चा समावेश करण्यात आला आहे. ते कार्यालय सध्या सुरू असलेल्या चिंचवडमधील एल्प्रो मॉलजवळ असणार आहे. · क क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 2, 9 आणि 10 असणार आहे. ते कार्यालय नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमयशेजारी आहे. · ड क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 21, 27, 28 आणि 29 असे चार प्रभाग असणार आहेत. ते कार्यालय पूर्वीप्रमाणे रहाटणी येथे असणार आहे. · ई क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 5 असणार आहे. ते कार्यालय पूर्वीप्रमाणे पांजरपोळ, भोसरी येथे असणार आहे. · फ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 1, 11 आणि 12 चा समावेश आहे. ते क्षेत्रीय कार्यालय पूर्वीनुसार निगडीतील टिळक चौकात असणार आहे. · ग क्षेत्रीय कार्यालयात 22, 23 आणि 24 हे तीन प्रभाग असणार आहेत. ते क्षेत्रीय कार्यालय पूर्वीप्रमाणे थेरगाव येथील पीसीपीएमसी-वेंगसरकर क्रिकेट अकादमी येथे असेल. · ह क्षेत्रीय कार्यालयात 30, 31 आणि 32 असे तीन प्रभाग असतील. ते कार्यालय पूर्वीप्रमाणे कासारवाडीतील महिला आयटीआय इमारतीत असणार आहे. · ज क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 16, 25 आणि 26 चा समावेश आहे. ते कार्यालय ताथवडे येथील महापालिका वाहनतळ इमारतीमध्ये असणार आहे. · ल क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 6, 7, 8 आणि 20 असणार आहे. ते कार्यालय संत तुकारामनगर, पिंपरी येथील म्हाडाच्या इमारतीमध्ये असणार आहे. · ड आणि ल क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक 4 प्रभाग. ड आणि ल क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक 4 प्रभागांचा समावेश करण्यात आला आहे. क्षेत्रीय कार्यालयांना अनुक्रमे राजगड, सिंहगड, विजयदुर्ग, देवगिरी, शिवनेरी, तोरणा, पुरंदर, प्रतापगड, राजगड आणि लोहगड अशी नावेही देण्यात आली आहेत. 

Advertisement Slot