"नाठाळाचे माथी काठी" हा संत तुकारामांचा संदेश विसरू नये: शरद पवार
Article link copied
पिंपरी (प्रतिनिधी) "भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी" हा तुकाराम महाराजांचा बाणा घेऊन पुढे जाण्याचा हा काळ आहे. रंजल्या गांजल्यांना सहकार्य करताना नाठाळाच्या माथी काठी हाणण्याचा तुकाराम महाराजांचा संदेश आजच्या काळात सुद्धा दुर्लक्षित करता येणार नाही. तुकाराम महाराजांनी कर्मकांड, ढोंगीपणा, जातीभेद, सत्तेचा अहंकार यावर कठोर प्रहार केले हे विसरता कामा नये, असे मत राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी मांडले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ आयोजित गांधर्व मंच आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभात पार पडला. त्यावेळी शरद पवार बोलत होते. या प्रसंगी साहित्यिक सदानंद मोरे, कलाकार अवधूत गुप्ते, खासदार श्रीरंग बारणे, महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी संत परंपरा, साहित्य, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक लोकशाही यावर भाष्य करताना शरद पवार पुढे म्हणाले, वारकरी परंपरेने महाराष्ट्रात सामाजिक लोकशाही प्रस्थापित केली. समाजाच्या जातीच्या भिंती ओलांडण्याचं काम केलं गेलं. पंढरपूरच्या वारीमध्ये श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष कोणत्या जातीचे असा कोणी विचार करत नाही. ते एकत्र चालतात. भारतीय राज्यघटनेतील समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ह्याची बीजं संत परंपरेमध्ये आपल्याला दिसतात. त्यामुळं संतांचा वारसा केवळ आध्यत्मिक नसून लोकशाही मूल्यांचा तो वारसा आहे. गेल्या तीन-चार दशकांमध्ये महाराष्ट्रात बरीच वैचारिक घुसळण झाली. संत तुकाराम महाराजांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली. पूर्वी त्यांना मर्यादित रचनाकाराच्या स्वरूपात आपल्यापुढे आणलं जात होतं पण नव्या पिढीच्या अभ्यासाकांनी तुकाराम महाराजांच्या संदर्भात नवीन मांडणी केली. त्यामध्ये डॉ. आ. हं. साळुंखे यांचा उल्लेख मी मुद्दाम करीन. साळुंखे ह्यांनी तुकाराम महाराजांना 'विद्रोही तुकाराम' असं म्हटलं. त्यांच्या काळात सामाजिक वास्तव काय होतं, आणि त्या वास्तवाला तुकोबाराय कसे भिडले, प्रस्थापित व्यवस्थेने त्यांना कसा छळलं, आणि त्यांच्याशी कसा संघर्ष केला, हे सगळं नव्याने मांडण्यात आलेला आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढणारे 'विद्रोही तुकाराम'यांच्या भोवती विणलेल्या चमत्कारिक कथा खोडून काढून तुकारामांचं एक तेजस्वी स्वरूप आपल्या सगळ्यांच्या समोर आलं. १२५ वर्षांपूर्वी शास्त्रीय संगीत काही ठराविक घरण्यांपुरतं मर्यादित होतं. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर ह्यांनी संगीत सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं. संगीत हे केवळ अभिजनांचं नसून सर्व समाजाचं आहे ही भूमिका त्यांनी घेतली. आणि त्या अर्थानं सांस्कृतिक लोकशाहीची एक मोठी चळवळ त्यांनी उभी केली. त्या काळात भारतीय शास्त्रीय संगीताची स्थिती चिंताजनक होती. अशा काळात पं. पलुस्कर ह्यांनी एक ध्यास घेतला, आणि तो ध्यास होता भारतीय शास्त्रीय संगीताला वैभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला. गांधर्व महाविद्यालया मंडळा'ची पायाभरणी त्यांनी केली ती फक्त शिक्षण संस्था नव्हती तर भारतीय संगीताच्या नवजागरणाचं केंद्र होतं, असेही शरद पवार म्हणाले.
Advertisement Slot