चालता बोलता न्यूज

Search Everything

'संघर्ष' हाच भाजपचा मूलस्वभाव; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा थरारक इतिहास! 

Main Admin / Jun 29, 2026, 09:55 AM IST

Article link copied

पिंपरी, (प्रतिनिधी): २५ जून १९७५ रोजी देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळ्या पर्वाला ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या वतीने 'लोकशाही रक्षक गौरव सोहळ्याचे' आयोजन करण्यात आले. या निमित्ताने आणीबाणीच्या काळातील संघर्ष, त्याग आणि लोकशाही रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा इतिहास पुन्हा एकदा उजाळला गेला. या प्रसंगी प्रमुख वक्ते आमदार श्रीकांत भारतीय यांनी आपल्या प्रभावी भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. हा सोहळा केवळ सन्मानाचा कार्यक्रम नसून नव्या पिढीला संघर्षाची प्रेरणा देणारा दीपस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचा उगम हा आणीबाणीच्या काळात असंख्य कार्यकर्त्यांनी केलेल्या त्याग आणि समर्पणातून झाला असून, 'संघर्ष' हाच आमच्या पक्षाचा मूलस्वभाव आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. इतिहास हा केवळ बुद्धीने वाचण्याचा विषय नसून तो मनापासून समजून घेण्याची गरज आहे, असे सांगत त्यांनी लोकशाही रक्षणासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांच्या बलिदानाची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, तसेच संघटनात्मक एकजूट आणि परस्पर समन्वय अधिक दृढ करण्याचे आवाहन केले. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आणीबाणीच्या काळातील दडपशाहीच्या आठवणींना उजाळा देत तत्कालीन काँग्रेस सरकारवर कठोर टीका केली. "भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील तो सर्वात काळाकुट्ट दिवस होता. जनतेचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्यात आले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली गेली. मात्र, असंख्य राष्ट्रभक्तांनी तुरुंगवास, अमानुष छळ आणि संकटे सहन करूनही हुकूमशाहीपुढे कधीही शरणागती पत्करली नाही. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण मुक्त भारतात स्वाभिमानाने श्वास घेत आहोत," असे ते म्हणाले. यावेळी आणीबाणीच्या काळात सत्याग्रह केलेल्या तसेच अंतर्गत सुरक्षा कायद्याअंतर्गत कारावास भोगलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते 'लोकशाही रक्षक पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला. या भावनिक क्षणांनी उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पक्षाचे संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी केले. यावेळी आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, माजी आमदार अश्विनीताई जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अभिषेक बारणे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ नेते मधू जोशी, आणीबाणी सत्याग्रही संघटनेचे आबा खांबे, माजी अध्यक्ष डॉ. बाळकृष्ण नाईक, युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, माजी विरोधी पक्षनेत्या डॉ. गीताताई आफळे, मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडये, संजय पटनी, संतोष तापकीर, कैलास सानप, अजय पाताडे, पोपट हजारे, राजू दुर्गे, देवदत्त लांडे, अजित कुलथे, नंदू भोगले यांच्यासह विविध आघाड्या, प्रकोष्ठ, मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेवक, शक्तिकेंद्र प्रमुख, मतदान केंद्र प्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Advertisement Slot