चालता बोलता न्यूज

Search Everything

पाणीपुरवठा विभागाच्या निविदेत ‘रिंग’चा आरोप; प्रक्रिया रद्द करण्याची नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी 

Main Admin / Jun 23, 2026, 08:00 AM IST

Article link copied

पिंपरी (प्रतिनिधी) : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी ही निविदा तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. निविदेतील काही अटी विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी आखण्यात आल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील विविध पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांच्या वितरण व्यवस्थेचे परिचालन, देखभाल आणि दुरुस्ती यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. मात्र, या निविदेतील अटींमध्ये विसंगती, तफावत आणि स्पर्धाविरोधी बाबी असल्याचा आरोप वाघेरे यांनी केला आहे. निविदेची रचना अशी करण्यात आली आहे की, काही मोजक्या ठेकेदारांनाच त्याचा फायदा होईल, असा संशय त्यांनी व्यक्त केला. वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या धोरणानुसार सार्वजनिक कामांमध्ये सुशिक्षित बेरोजगार, स्वयंरोजगार गट, बेरोजगार सेवा सहकारी संस्था आणि लघु संस्थांना संधी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सद्य निविदेतील अटींमुळे या स्थानिक घटकांच्या सहभागावर मर्यादा येत असून त्यांना प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक पात्र आणि गरजू संस्थांना या कामासाठी स्पर्धा करण्याची संधी मिळणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, प्रत्यक्ष कामाचे स्वरूप हे व्हॉल्व ऑपरेशन, पाणीपुरवठा नियंत्रण, देखभाल आणि किरकोळ दुरुस्तीपुरते मर्यादित असताना निविदेत "परिचालन" ही व्यापक संज्ञा वापरण्यात आली आहे. यामुळे निविदेच्या कक्षेबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे वाघेरे यांनी नमूद केले. याशिवाय, अकुशल कामगारांसाठीही अनुभव प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आल्याने ही अट अव्यवहार्य आणि अन्यायकारक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व बाबींची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच सद्य निविदा प्रक्रिया तात्काळ स्थगित किंवा रद्द करून सुधारित, पारदर्शक आणि निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देणाऱ्या अटींसह नव्याने निविदा प्रसिद्ध करावी, अशी मागणी वाघेरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. 

Advertisement Slot