पिंपरी चिंचवड
गेल्या काही दिवसांपासून शहरात अवजड वाहनांमुळे अपघातांच्या घटना वाढत आहेत. यात बसमुळे होणाऱ्या अपघातांमुळेही चिंता व्यक्त केली जात आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५,१३२ खासगी बसची तपासणी करून त्यातील १,६०२ बसवर कारवाई करण्यात आली. यात एक कोटी १५ लाख ५२ हजारांचा दंड देखील आकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अर्थात आरटीओ कडून ही कारवाई जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात तसेच हिंजवडी आयटी पार्क व चाकण एमआयडीसी परिसरात प्राणांतिक अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.अपघातांचे सत्र थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागणी सातत्याने केली जात होती त्या नंतर प्रशासनाकडून पावले उचलत. वाहतूक पोलिस आणि पिंपरी-चिंचवड ‘आरटीओ’कडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे चालक रडारवर आहेत.
